तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे ५ जुलैला प्रस्थान, अधिक मासामुळे आठवड्याचा फरक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३३३वा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अर्थात ५ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे. ७ जुलैला पालखी सोहळा पुण्यात आणि २२ जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे.

अधिक मासामुळे सोहळा कार्यक्रमास नेहमीपेक्षा आठवडाभराच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे; तर परतीच्या प्रवासात एक तिथी वाढल्याने हडपसर येथील मुक्काम वाढविण्यात आला असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब मोरे यांनी दिली. पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे यावेळी उपस्थित होते. परंपरेनुसार यंदा पालखीचा पुण्याच्या नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरातील दोन दिवस मुक्काम वगळता प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे.

या पालखी सोहळ्यात प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार असून, इंदापूर, तसेच सराटी येथील माने विद्यालयाजवळ व माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले-बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे भाविकांना उभे रिंगण पाहायला मिळणार आहे. देहूतील मुख्य मंदिरातून ५ जुलैला पालखी सोहळा प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात होणार आहे. ६ जुलै विठ्ठल मंदिर-आकुर्डी, ७ व ८ जुलै श्री निवडुंगा श्री विठ्ठल मंदिर-पुणे, ९ जुलै विठ्ठल मंदिर-लोणी काळभोर, १० जुलै यवत, ११ जुलै वरवंड, १२ जुलै उंडवडी गवळ्याची, १३ जुलै शारदा विद्यालय-बारामती येथे मुक्काम असणार आहे.

१४ जुलै रोजी सणसर, १५ जुलै बेलवडी-निमगाव केतकी, १६ जुलै इंदापूर, १७ जुलै सराटी, १८ जुलै मान विद्यालय-अकलूज, १९ जुलै माळीनगर-बोरगाव, २० जुलै तोंडले-बोंडले-पिराची कुरोली, २१ जुलै बाजीराव विहीर-वाखरी तळ येथे मुक्काम असणार आहे. २२ जुलै रोजी दुपारी एक वाजल्यानंतर पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. २३ जुलैला नगरप्रदक्षिणा करून २७ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पालखी सोहळा पंढरपूर मुक्कामी राहणार आहे. २७ जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ८ ऑगस्ट रोजी देहू येथे सोहळा पोहोचणार आहे. जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ८ ऑगस्ट रोजी देहू येथे सोहळा पोहोचणार आहे.