
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा मौल्यवान प्राचीन मुकुट गायब असून, त्या जागी दुसरा मुकुट ठेवण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या तपासणी समितीच्या अहवालातून समोर आली होती. आता हा मुकुट तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत मुकुट सापडल्याचा दावा मोजदाद समितीचे सदस्य तथा पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकाराची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली होती. उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत मंदिर प्रशासनातील अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि महंतांचा सहभाग होता. या समितीने नुकताच अहवाल सादर केला होता. यात श्री तुळजाभवानी देवीचा प्राचीन मुकुट गायब असून, त्या जागी दुसरा मुकुट ठेवण्यात आला आहे. तसेच देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक दुर्मिळ अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
आता हा गायब असलेला 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत सापडल्याचा दावा मोजदाद समिती सदस्य तथा पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, मंदिर प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.























































