तुळजाभवानीचं ‘पेड’ दर्शन महागलं, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचा दरवाढीचा निर्णय

तुळजाभवानी मातेचे पेड दर्शन महागले आहे. आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या ’पेड’ दर्शन दरामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली. २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ही दरवाढ राहणार आहे. याबाबत मंदिर संस्थानने नुकतेच एक पत्रक प्रसिध्द केले आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, आगामी शारदीय नवरात्र महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन या पेड दर्शनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये देणगी दर्शन पासला सध्या २०० रुपये आकारले जात असून शारदीय नवरात्र महोत्सवा दरम्यान ३०० रुपये, ५०० रुपये किंमतीच्या देणगी दर्शन पासला १ हजार रुपये, स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पासला २०० ऐवजी ५०० रुपये तर सकाळच्या अभिषेक पासला ३०० ऐवजी ४०० रुपये आकारण्यात येणार आहेत.