कोकणात हळदीची हमीभाव करार पद्धतीने शेती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने कोकणातील शेतकऱ्यांना विक्रीच्या किंमतीसह, पिकवाल तेवढी हळद खरेदी करण्याची हमी देणाऱ्या हर्बल मेडिसिन कंपनी बरोबर करार पध्दतीने हळदीच्या शेतीचा पर्याय पुढे आणला असून संस्था आपल्या वतीने हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करणार आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकणात आता शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करु लागला असून त्यामध्ये हळद लागवडीचीही भर पडली आहे. हळद हे पीक 9 महिन्यांचे आहे. मात्र पीक आल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते . कोकणात हळद पावडरची किरकोळ विक्री 200 ते 250 रुपये दराने होते . सांगली बाजारपेठेत गेली तीन वर्षे हळदीला 5 ते 9 हजार एवढा क्विंटलला दर मिळत आहे . मात्र कोकणच्या शेतकऱ्याला हा दर 5 ते 5 हजारच्या वर मिळत नाही ही शोकांतिका आहे. हळद पावडर करुन विकणे त्रासाचे तर आहेच शिवाय हळद पावडर विक्री ही मर्यादीत स्वरुपाचीच होत असते. उत्तम पीक आल्यास एकरी 2 ते 2:5 टन सुकलेली हळद पिकते. यासर्व बाबींचा विचार करुन चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या पुढाकारातून हळद विक्रीसाठी हर्बल मेडिसिन कंपनी बरोबर हमी भावात विक्री करार करण्यात आला असून शेतकऱ्यांना शेतीचा आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळवण्याचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

हळद मोठ्या प्रमाणात जेवणात, रंगात आणि औषधात वापरली जाते. आता आधुनिक संशोधनात हळदी मधील कुरकुमीन घटक वापरून कॅन्सरसह विविध आजारावर हर्बल औषधे बनवली जात आहेत. यासाठी हळदी मधील कुरकुमीन घटक जेवढा अधिक तेवढी हळदीला किंमत अधिक आहे. गावठी हळदीमध्ये अंदाजे दीड ते दोन टक्के तर सेलम मध्ये पाच टक्क्यांपर्यंत कुरकुमीन असते. आधुनिक 15 टक्के कुरकुमीन असलेली हळदीची प्रजाती विकसीत झाली आहे. या जातीची लागवड केल्यास हळदीला चांगला दर मिळू शकतो.

जर कोकणात अशा प्रकारची हळद उत्पादीत केली तर पिकवाल तेवढी कितीही हळद घेण्याची तयारी सदर कंपनीने दाखवली आहे. आधुनिक पध्दत नवीन बियाणे, नवीन औषधे यामुळे पहिल्यावर्षी एकरी उत्पादन खर्च पाच ते साडेपाच लाखांवर जातो परंतू विक्रीची किंमत सुध्दा साडेसात ते आठ लाख होवून दोन ते अडीच लाख एवढा खात्रीशीर नफा यामध्ये अपेक्षित आहे. उत्पादन खर्चासाठी शेती उत्पादक कंपनी सोसायटी आदींच्या माध्यमातून बॅंक कर्ज सहज उपलब्ध होणार आहे . हर्बल कंपनी बॅंकेचे हप्ते भरणार आहे. हळद विक्रीच्या हमीभावासह व उत्तम लाभ मिळवून देणाऱ्या करार पध्दतीच्या हळदीची शेती करु ईच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन निसर्ग मित्रच्या भाऊ काटदरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सह्याद्री निसर्ग मित्र 9373610817, 9423831700 येथे संपर्क साधावा.