
>> डॉ. विजया वाड
दहावीचं वर्ष. अभ्यासाचा डोंगर प्रत्येकालाच पार करायचा. हुशार मुलांनी थोडी मदत आपल्या कच्च्या मित्रांची केली तर…
मोठय़ाबाई, येऊ का आत?’’ हेमा-मिलिंद पाटील हेडबाईंना केबिनमध्ये येण्याची परवानगी मागत होते. ‘‘या या. बसा. थोडय़ा सह्या राहिल्यात त्या करून बोलते हं.’’ मोठय़ा बाईंनी आपल्या पुढचं काम तातडीनं आटपलं.
‘‘बोला, पाटील.’’ ‘‘आमची मुलगी मिताली हिला आपल्या शाळेतून काढून दुसरीकडे घालायचीय.’’ ‘‘अहो, आता ती नववीतून दहावीत जाईल. चार महिन्यांत अशी शाळेच्या शेवटच्या वर्षात शाळा बदलतं का कुणी?’’ हेडबाईंनी प्रश्न केला. ‘‘स्पष्टच सांगते, माझी जाऊ सुनंदा हिचा मुलगा विद्याधर म्हणजे माझा सख्खा पुतण्या त्याच वर्गात आहे.’’ बोलता बोलता हेमाचे डोळे पूर्ण जलसरोवर झाले. ते निपटत ती म्हणाली, ‘‘त्याचा कॉम्प्लेक्स मितालीला नको. सुनंदा सतत हेटाळणी करते तिची. माझा विद्या पहिला नंबर काढतो नि ही शेवटून दुसरी… तिसरी! मिताली खूप डिप्रेस झालीय. नकोच ही तुलना! शाळा बदलून टाकूया.’’ ‘‘हेमाताई, तुम्ही सर्व काळजी सोडा बघू.’’ ‘‘बाई, मिताली या वयात हसेनाशी, बोलेनाशी झालीय.’’ हेमाला रडू आवरेना. मिलिंदही सर्द सर्द… बाईंनी उठून हेमाला पाणी दिले. म्हणाल्या, ‘‘मिताली काही तुम्हा दोघांचीच इष्टेट आहे का? मी तिला माझी मुलगीच मानते. आजपासून सारी जिम्मेदारी मजवर सोडा.’’ हेमा-मिलिंद पाटील घरी परतले. स्वयंपाकात हेमाचं मनच नव्हतं. शेवटी मिलिंदने कुकर लावला. आज डाळ भातच खाऊ. पण हेमा-मिलिंदची मुलगी मिताली घरी आली तीच मुळी विद्याधरसोबत.
‘‘काकू, आज तुझ्या हातचं थालीपीठ खावंसं वाटतंय. करतेस?’’ विद्याधरचे हे शब्द ऐकून काकू मोहरली. सुरेख थालीपीठे तिने तयार केली. ‘‘जगात तुझ्यासारखे थालीपीठ कुणाला जमत नसेल. काकू यू आर ग्रेट.’’ विद्याधरच्या स्तुतीने तिला गुलाबपाणी अंगावर सिंचन केल्यागत वाटले. त्या बोलाचा सुवास मनभर पसरला. ‘‘काकू, मितालीची शाळा तू माझ्यासाठी बदलतेयस? का गं? ती म्हणाली, ‘मी हुशार, तुलना होते. म्हणून काकू मी यावेळी नववीचे पेपर चतकोरच सोडवतो. पासापुरते मग तर मी नि मितू सारखे होऊ?’’ तो घळघळ रडू लागला. ‘‘माझ्या आईचे तोंड मी धरू शकत नाही गं काकू.’’ हेमाचे मन विरघळले. तिने रडणाऱया विद्याधरला घट्ट जवळ घेतले.मिलिंद बघत होता. अनिमिष नेत्रांनी. ‘‘आता मीच मितूचा अभ्यास घेतो. टय़ूशन टीचरची फी मात्र जबरदस्त हं! एक दिवस थालीपीठ, एक दिवस आक्की रोटी, एक दिवस उकड, एक दिवस शिरा प्रसादाचा, दोन दिवस इडली-डोसा!’’ ‘‘ऍग्रीड.’’ काकू म्हणाली. अशी शाळा सुटताच शिकवणी सुरू झाली. निबंध, प्रश्न मुद्देसूद कसे लिहावे हे समजावून सांगत होता. रोज एक पान लिही, अक्षर सुधारेल. वेग वाढेल. स्वतंत्र विचार करायची क्षमता येईल, अशा गोष्टी तिला सांगत होता. नि ती त्या साऱया आचरणात आणीत होती. परिणाम? गुणात वीस टक्के वाढ. चाळीस टक्के ते चक्क साठ? अरे व्वा! सर्वत्र तिचे नि तिच्या बंधूराजाचे कौतुक..ही सारे हेडबाईंची छुपी किमया बरं!
ही एका विद्याधरची गोष्ट नाही. प्रिय वाचकांनो! अनेक विद्याधरांची आहे. मी प्राचार्यपदी असताना प्रत्येक हुशार विद्यार्थ्याला एक अप्रगत मूल दत्तक देत असे. शाळेचा निकाल उंचावत उंचावत शंबर टक्के तेव्हाच जातो ना? हुशार मुलांना अतिहुशार करण्यापेक्षा अप्रगत मुलांना आनंदी मनाने प्रगतीपुस्तक हाती घेऊन जाताना बाघणे ही शिक्षकासाठी आनंदाची पर्वणी आहे.





























































