
गणेशोत्सवासाठी उसळणारी गर्दी पाहून मध्य रेल्वेच्या सहाय्याने कोकण रेल्वेने तुतारी एक्स्प्रेस आणि मडगाव एसी डबलडेकरला जादा डबे जोडण्याचा निर्णय नुकताच घेतला. आता 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान ‘तुतारी एक्स्प्रेस’च्या दादर फलाटाचा आणि येण्या व जाण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान कोकणात जाणारी ट्रेन क्र. 11003 दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस दादरच्या फलाट क्र. पाचवर रा. 11.55 वाजता येईल आणि रात्री 12.10 वाजता सुटेल. तर कोकणातून येणारी ट्रेन क्र. 11004 सावंतवाडी रोड-दादर तुतारी सकाळी 6.30 वाजता दादर फलाट क्र. 5 वर रिकामी होईल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. इतर वेळेत कोणताही बदल केलेला नाही. कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या सणासाठी होणारी गर्दी पाहता तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.



























































