TVK Vijay Rally Stampede – चेंगराचेंगरीच्या दुसऱ्याच दिवशी बॉम्बने उडवण्याची धमकी; थलपती विजय यांच्या सुरक्षेत वाढ

तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी थलपती विजय याच्या नव्या पक्षाच्या जाहीर सभेत शनिवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतील 39 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 51 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेच्या दुसऱ्याच दिवशी विजय यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून विजय यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे विजय यांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. विजय यांच्या निवासस्थानाबाहेर चेन्नई पोलीस आणि सीआरपीएफ जवान तेथे तैनात करण्यात आले आहेत.सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमकी मिळाल्यानंतर स्निफर डॉग्ससह बॉम्ब पथक घटनास्थळी पोहोचले आणि विजयच्या घराची सुरक्षा तपासणी करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी विजयच्या समर्थकांना आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विजयने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

तामीळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम
विजय यांच्या सभेची वेळ चुकल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजयच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने करूर येथील सभेसाठी दुपारी 3 ते रात्री 10ची वेळ मागितली होती. मात्र विजय सभेच्या ठिकाणी तब्बल 7 तास उशिरा पोहोचले. तोपर्यंत लोकांची घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. यानंतर विजय यांचे भाषण सुरू झाल्यावर लोक स्टेजच्या दिशेने सरकू लागले. त्यातून रेटारेटी आणि चेंगराचेंगरी झाली व पुढील अनर्थ घडला.

विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात याचिका दाखल केली असून सीबीआय चौकशी मागणी केली आहे. तसेच करूर पोलिसांनी टीव्हीके अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

वेळ चुकली आणि काळाने डाव साधला! थलपती विजयच्या सभेत नेमकं काय घडलं? तामीळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम