
टूलकिट वाद आणि सोशल मीडियाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांविषयी ट्विटरने आपले मौन सोडले आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारकडून नवीन गाईड लाइन लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे. या नवीन आयटी नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच अलीकडे कंपनीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील ट्विटर कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेबद्दलही काळजी व्यक्त केली.
ट्विटरने कोणत्या मुद्दय़ांवर दिली प्रतिक्रिया
कर्मचाऱयांच्या सुरक्षेवर चिंता ः हिंदुस्थानातील आपल्या कर्मचाऱयांच्या सुरक्षेविषयी ट्विटरने चिंता व्यक्त केली. याशिवाय ज्या लोकांना आम्ही सर्व्हिस देतो, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलदेखील आम्ही काळजीत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. तथापि ट्विटरने थेट दिल्ली पोलिसांचे नाव न घेता हिंदुस्थानसह जगभरातील पोलिसांच्या धमकी देणाऱया प्रवृत्तीबद्दल चिंतेत असल्याचे सांगितले आहे.
नवे सोशल मीडिया नियम ः केंद्र सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे, परंतु ते पारदर्शकतेच्या तत्त्वांसह परिपूर्ण असायला हवे. या प्रकरणी हिंदुस्थान सरकारशी चर्चा सुरू ठेवणार असल्याचे ट्विटरने सांगितले. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी ट्विटरने मागितला आहे.
अधिकारी नियुक्ती ः केंद्र सरकारने या मार्गदर्शक सूचनांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हिंदुस्थानात तक्रार अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरील कंटेंटसाठी तक्रार अधिकारी जबाबदार असतील. हा नियम पुढे धोकादायक पातळीवर जाईल, असे ट्विटरने म्हटले आहे.
मार्गदर्शक सूचना कशी लागू करावी ः आम्ही हिंदुस्थानी जनतेसाठी कटिबद्ध असून आमची सेवा संवादासाठी एक प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना काळात आमची सेवा ही आधार देणारी ठरली आहे. ट्विटरने पुढे म्हटले की, हिंदुस्थानात सेवा पूर्ववत सुरू ठेवण्याकरिता आम्ही हे आयटी नियम लागू करण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करताना आम्ही पारदर्शकता, अभिव्यक्तीला बळकटी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.




























































