
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने एका महिन्यात 45 हजार हून अधिक हिंदुस्थानी खाती बंद केली आहेत. अश्लीलता पसरवणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे अशा कारणांमुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी आपला अहवाल शेअर करताना ट्विटरने म्हटले की जुलैमध्ये ऐकूण 45,191 हिंदुस्थानी ट्विटर खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अहवालानुसार, ट्विटरने बाल लैंगिक शोषणाचा प्रचार करणाऱ्या आणि अश्लील व आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या 42,825 खात्यांवर बंदी घातली आहे. तर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या कारणावरून 2,366 खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दर महिन्याला नवीन IT नियम, 2021 नुसार त्यांचा अहवाल शेअर करतात.
ट्विटरने सांगितले की, 26 जून ते 25 जुलै या एका महिन्यात देशभरातील वापरकर्त्यांकडून 874 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 70 तक्रारींवर कारवाई करण्याची गरज वाटली. ट्विटरने आपला तक्रार कक्ष स्थापन केला आहे, यात तक्रारींचे निराकरण करून त्यांचा अहवाल सरकारला सादर केला जातो. जूनमध्येही ट्विटरने 43,140 हिंदुस्थानी खात्यांवर बंदी घातली होती.



























































