
लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरची सेवा बुधवारी संपूर्ण दिवसभर ठप्प राहिली. परिणामी एरव्ही तासन्तास ‘टिवटिवाट’ करत बसणाऱया नेटकर्यांपुढे गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. ट्विटरलाही सेवा बंद होण्यामागील कारण दिवसाअखेरपर्यंत शोधता आले नाही. मंगळवारी रात्रीपासूनच ट्विटरची सेवा ‘डाऊन’ होत चालली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याचा हिंदुस्थानसह जगभरात जपान, कॅनडा, लंडन आदी विविध देशांतील लाखो युजर्सना फटका बसला. युजर्सनी मंगळवारी रात्रीपासून तक्रारींचा धडाका लावला होता. त्यावर ट्विटरने लवकरच सेवा पूर्ववत करू, अशी हमी देत दिलगिरीचे ट्विट केले. मात्र बुधवारी संपूर्ण दिवसभर ट्विटरला सेवा डाऊन होण्यामागील कारण सापडले नाही. ट्विटरची साईट ओपन केली की ‘एरर’ हाच मेसेज युजर्सना पाहायला मिळाला. ट्विटरसह ट्विटडेकही ठप्प झाल्याने युजर्सची निराशा झाली.




























































