शेतीच्या वादातून खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। इस्माईलपूर

जमिनीच्या वादावरून २०१० साली माधव बळवंत देशमुख यांची हत्या करणाऱ्या हरी सावंत आणि विजू सावंत या हल्लेखोरांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली आहे.

प्रताप बळवंत देशमुख (इस्माईलपूर शिवार, ता. पैठण) यांच्या वडिलांनी बंडू सावंत (६८, रा. दहिफळ, ता. शेवगाव, जि. नगर) यांच्याकडून दोन एकर शेतजमीन विकत घेतली होती. त्यांनी ही शेतजमीन मयत माधव बळवंत देशमुख यांच्या नावे केली होती. प्रताप याने पैठण न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकालदेखील प्रताप देशमुख यांच्याकडून लागला होता.

१६ डिसेंबर २०१० रोजी प्रताप यांच्या आईचे निधन झाले. २६ डिसेंबर रोजी दहाव्याचा कार्यक्रम सुरू असताना रोहिदास बंडू सावंत व हरी बंडू सावंत यांनी शेत नांगरण्यास सुरुवात केली. त्यानंतर १३ व्याचा विधी सुरू असताना सावंत बंधूनी पुन्हा शेतात घुसून ऊस तोडण्यास सुरुवात केली. दरम्यान, माधव बळवंत देशमुख यांच्या पत्नी सुनीता यांनी ऊस तोडण्यास विरोध केला. त्यावेळी सावंत बंधूं त्यांना दमदाटी करून निघून गेले. सहा जानेवारी २०११ रोजी दुपारी एक वाजता बंडू सावंत, रोहिदास सावंत, हरी सावंत, विजू सावंत, अंबादास ढाकणे, ज्ञानेश्वर काकडे हे सहा जण पुन्हा शेत नांगरण्यास आले .त्यावेळी प्रताप आणि माधव देशमुख यांनी विरोध केला असता रोहिदास आणि हरीने माधव यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. पण उपचार सुरू असताना माधव यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रताप देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले.

या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार खंडाळकर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. मयत माधव यांची पत्नी सुनीता व प्रत्यक्षदर्शी भाऊसाहेब यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने हरी सावंत आणि विजू सावंत या दोघांना दोषी ठरवून जन्मठेप, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि ३२४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी, १४३ कलमान्वये एक महिना, १४८ कलमान्वये आठ महिने कारावासाची शिक्षा सुनावली असून, या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत.