
सामना प्रतिनिधी । पुणे
वडिलोपार्जित जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर पती-पत्नीचे नाव लावण्यासाठी त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रशेखर जगन्नाथ दगडे (वय ५०, रा. थेऊर) या मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती अशोक तात्याबा वाघमारे (वय ३४, रा. उरुळी कांचन) या दोघांना अटक केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीची नोंद मंजूर करून ती नावे सात-बाराच्या उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी थेऊर येथील कार्यालयात अर्ज केला होता.या कामासाठी दगडे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी दगडेच्या वतीने लाच स्वीकारताना वाघमारेला रंगेहाथ पकडण्यात आले.































































