
सामना प्रतिनिधी । मुंबई
रस्ता रुंदीकरणातील बाधितांसाठी चेंबूरच्या माहुल रोडवर पालिकेने इतर प्राधिकरणा मार्फत बांधलेल्या खोल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणालाही मिळवून देणाऱया टोळीतील दोघे झोलर गुन्हे शाखा युनिट-6 च्या हाती लागले आहेत. बनावट कागदपत्रे व संबंधितांचे खिसे गरम करून या टोळीने अनेकांना त्या खोल्या मिळवून दिल्याचे समजते. आता टोळीतील आणखी आरोपींना अटक करायचे असून चौकशीत संपूर्ण झोल समोर येईल असे अधिकाऱयांनी सांगितले.
वाडीबंदर येथील एसव्हीपी व जेएमआर मार्गावरील फुटपाथवर राहणाऱया पण रस्ता रुंदीकरणात घर गेले त्या नागरिकांसाठी माहुल रोडवरील आरएनए पार्पमध्ये पालिकेच्या माध्यमातून ‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत म्हाडा, एमएमआरडी या प्राधिकरणांनी राहण्याची व्यवस्था केली आहे, पण काही झोलर बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे कोणालाही पालिकेच्या त्या खोल्या मिळवून देत असल्याची खबर युनिट-6 चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांना मिळाली. मग उपायुक्त अकबर पठाण व पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी, एपीआय घाग, गायकवाड, उपनिरीक्षक इंदुलकर, अंमलदार लामखेडे, गाडे आणि पथकाने अल अमीन मोहम्मद सलीम खान (36) आणि हिलाल अब्दुल रफिक शेख (48) या दोघांना पकडले. त्यांच्याकडे तीन शिधावाटप पत्रिका, 11 सर्व्हे पावत्या, दोन उमेदवारी कार्ड, खरेदी खत, ऍफेडेव्हिट, पॉवर ऑफ ऍटर्नी आदी बोगस कागदपत्रे सापडली आहेत. याप्रकरणी युनिट-6 चे पथक अधिक तपास करीत आहेत.
आरोपींनी अधिकाऱयांना हाताशी धरून कोणालाही त्या खोल्या मिळवून दिल्याचे समोर येत आहे. त्यात आरोपींनी लाखो रुपये कमावले असून त्यातून गडगंज प्रॉपर्टी बनविल्याचे समजते. याप्रकरणी आणखी भामटय़ांचा समावेश असून ही टोळी जेरंबद केल्यानंतर सर्व झोल समोर येईल असे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.
































































