
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱया वृद्धांना हेरत हातचलाखी करून पैसे घेऊन पळून जाणाऱया दोन ठगांना कुरार पोलिसांनी गजाआड केले. रमेश देवणगाव आणि फिरोज पठाण अशी त्या दोघांची नावे असून त्याचा तिसरा साथीदार हा फरार असून त्याच्या अटकेसाठी कुरार पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
तक्रारदार किशोरीलाल बिसा हे ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या आठवडय़ात बिसा हे त्याच्या मालकांनी दिलेले पैसे बँकेत भरण्यासाठी दिंडोशी कोर्टाजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेले होते. बिसा हे पैसे भरत असताना रमेशने मागून आवाज दिला. दोन बंडल एकत्र टाकू नका, अन्यथा पैसे एटीएममध्ये अडकतील असे रमेशने बिसाना सांगितले. त्यानंतर पैसे जमा होत असताना अचानक पाचशे रुपयांची नोट बाहेर आली. ती नोट घेतल्यावर बिसा यांना पैसे जमा झाल्याची पावती मिळाली नाही. त्याचा फायदा रमेशने घेतला. तुमचे पैसे खात्यात जमा झाले का हे पाहण्यासाठी बँकेत जाऊन चौकशी करण्यास रमेशने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून बिसा हे बँकेत गेले. पैसे जमा झाल्याबाबत बँकेत मॅनेजरला विचारणा केली. सायंकाळी बिसा यांच्या मालकाने बँक खाते तपासले तेव्हा त्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिसा यांनी कुरार पोलीस तक्रार दाखल केली. परिमंडळ-12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चाळके, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, सकट, तांबे, वेदांते, बहिरम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी बँकेतील त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना गाडीचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरवत पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
डबल क्लिक करायला विसरू नका
एटीएममध्ये पैसे भरल्यावर कन्फर्म बटणाला दोनदा क्लिक केल्यावरच तुमचे पैसे जमा होतात. हे वृद्धांना फारसे माहीत नसते. याचाच फायदा ही टोळी घेत होती. एटीएमद्वारे पैसे जमा झाल्याचे भासवत ही टोळी वृद्धांना बोलबच्चन देत बाहेर काढायची. ते बाहेर गेले की फिरोज हा पॅन्सलचे बटण दाबून पैसे/ काढून घेत असायचा. फसवणुकीच्या पैशातून रमेश गाडीचा मेटेनन्स आणि डिझेलचे पैसे काढून घ्यायचा. त्यानंतर उर्वरित रक्कम ते तिघे वाटून घेत असायचे.

























































