
व्याजाने घेतलेल्या दोन लाख रुपयांचे 14 लाख रुपये मागणाऱ्या दोघा सावकरांना खंडणीविरोधी पथक एकने अटक केले आहे. उमेश चंद्रकांत घारे (रा. सनसिटी वडगाव) आणि संदीप घारे (रा. वारजे माळवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रवीण रतीलाल बाफना यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली आहे. प्रवीण यांना दोन लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी खासगी सावकार उमेश घारे यांच्याकडून 2019 मध्ये 2 लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात मोटार गहाण ठेवली होती. त्यानंतर कर्जाची मुद्दल आणि व्याज देण्यास उशीर झाल्याचे सांगून उमेश प्रवीण यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत होता. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात प्रवीण यांचा मित्र समाधान डावरे यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांची दुचाकी ओढून नेली.
आरोपी सावकार प्रवीण यांच्याकडे 2 लाख रुपये मुद्दल आणि 24 महिन्यांचे थकलेले व्याज आणि दंड मिळून 14 लाखांची मागणी करीत होते. याप्रकरणी प्रवीणने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही सावकारांना समज दिली होती. त्यानंतरही सावकरांनी प्रवीण यांना शिवीगाळ देण्याचे थांबविले नाही. त्यामुळे प्रवीणने दोघांविरुद्ध खंडणी विरोधी पथक एक यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार पथकाने सावकरांचे घर आणि दुकानावर छापा टाकून विविध कागदपत्रे जप्त करून त्यांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, प्रवीण रजपूत, मधुकर तुपसौंदर, अतुल साठे, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, अमर पवार, अश्विनी केकाण, प्रफुल्ल चव्हाण, हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.
























































