
दुचाकीला धक्का लागल्यामुळे दुचाकीस्वारासह त्याच्या मित्राने रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली. घटनेनंतर पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
किरण राजू दांडेकर (वय 30, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी मुकील गफूर शेख (रा. कोंढवा), अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक केली आहे. मधुकर दांडेकर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रिक्षाचालक किरण, भाऊ मधुकर, बंटी कसबे आणि मित्र हे भापकर चौकातील पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार मुकीलला रिक्षाचा धक्का लागल्यामुळे त्याने किरणसोबत वादावादी केली आरोपी मुकील, त्याचा मित्र अरबाज यांनी किरणला बेदम मारहाण केली. एका आरोपीने किरणच्या छातीवर लाथ मारल्याने किरण बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
आरोपी मुकील आणि अरबाज फरार झाले होते. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तातडीने तपास करीत दोघांना अटक केली. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे तपास करत आहेत.
दुचाकीला धक्का लागल्यामुळे हल्लेखोरांनी रिक्षाचालक तरूणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
– अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे
























































