
नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या फोटोग्राफर तरूणाला जबरदस्तीने धमकावत त्याच्या खिशातील मोबाईल व स्मार्ट वॉच हिसकावत पसार झालेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल, स्मार्ट वॉच जप्त करण्यात आले आहे. अमित प्रकाश इंगोले (19), सागर सुनिल सांगडे (21, रा. दोघेही. खराडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी एका 26 वर्षांच्या तरूणाने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार तरूण हा फोटोग्राफर आहे. शुक्रवारी तो नगर रस्त्यावरील हॉटेल मराठा दरबार येथे जेवणासाठी आला होता. याचवेळी आरोपी इंगोले आणि सांगडे यांनी तक्रारदाराची अडवणूक करून धमकाविले. त्याच्याकडील मोबाईल व हातातील स्मार्ट वॉच काढून चोरटे तेथून पसार झाले. याबाबत तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या दरम्यान गुन्ह्यातील दोघे संशयीत हे मंत्री आयटी पार्क जवळीस मोकळ्या जागेत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, अंमलदार योगेश थोपटे, गिरीष नाणेकर, सचिन जाधव, सचिन कदम, दादा बर्डे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.






















































