
गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या दोन सराईतांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
महेश काशिनाथ काळे (25, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), आण्णासाहेब शिवाजी कोल्हे ( 21, रा. मुलानी वडगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना एकजण नगर-संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पथकाने सापळा रचला असता, दोनजण संशयास्पद रितीने फिरताना आढळून आले. पथकाने घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे व दोन मोबाईल असा 99 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारहाण व शस्त्र बाळगणे व विकणे असे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजय बेठेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, कॉन्स्टेबल रोहिदास नवगिरे, संदीप दरंदले, मेघराज कोल्हे, चालक हेडकॉन्स्टेबल बबन बेरड यांनी ही कारवाई केली.

























































