
सामना प्रतिनिधी । लातूर
पेठ शेत शिवारात विहिरीवरील विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या एकाला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गळकटे यांच्या विशेष पथकाने चोरट्यांना अटक केली. धनराज उर्फ शिवराज पंढरीनाथ दोरमाने यांनी 11 जानेवारीला पेठ शिवारातील विहिरीवरील एक 5 एचपी, 3 एचपी पाणबुडी मोटार (एकूण किंमत 15000 रुपये) अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती मिळवून विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोपाळनगर लातूर येथे सापळा रचून रवी सोमनाथ कोळंबे (20, रा. रायवाडी ता.जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्यास चौकशी केली असता त्याने पेठ शिवारातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरल्याची कबुली दिली. त्याने मोटार चोरी करून साथीदार संतोष बापु रसाळ (रा. रामगिरी नगर, लातूर) याच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले. पोलीस ठाणे औसा, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील शेत शिवारातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरल्याची कबुलीही चोरट्यांनी दिली. त्यांच्याकडून चोरलेल्या तीन विद्युत मोटार (किंमत 15000 रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत. यातील चोरट्यांकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना लातूर ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.






























































