वृद्धांना लक्ष्य करून सोनसाखळी लुटणाऱ्या दुकलीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहाटेच्या वेळेस रिक्षातून येऊन वृद्धांच्या सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीला बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. कुतुबुल्ला शुकरुल्ला शाह ऊर्फ चिकना आणि अमीन अब्दुल मोबीन खान ऊर्फ काल्या अशी या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार या बोरिवली परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात सकाळी त्या घराबाहेर पडल्या होत्या तेव्हा रिक्षातून आलेल्या एकाने त्यांची सोनसाखळी चोरून पळ काढला. सोनसाखळी चोरीप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी काही ठिकाणच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. तसेच खबऱ्याची मदत घेतली. त्यावरून चिकना आणि काल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर या दोघांनी चोरीची कबुली दिली. मालाड, कांदिवली, दहिसर परिसरात चोऱ्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.