वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक

हिंदुस्थानमध्ये आयसीसी महिला वर्ल्डकप सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या दोन महिला खेळाडूंसोबत मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये घाणेरडा प्रकार घडला. हॉटेलमधून कॅफेकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तींना त्यांना चुकीचा स्पर्श केला. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. अकील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानमध्ये आलेला असून आज त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाशी होणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर दुपारी तीन वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. या लढतीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ इंदूरमध्ये असून येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये महिला संघाचे वास्तव्य आहे.

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन महिला खेळाडू हॉटेलमधून द नेबरहूड कॅफेकडे निघाल्या होत्या. याचवेळी पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेल्या व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या मागे लागला. वेगाने दुचाकी पळवत त्याने ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिला खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला. सिमन्स यांच्या तक्रारीनंतर एमआयजी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी वेगाने सूत्र हलवली आणि परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकीवरून जाताना कैद झाला होता. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी अकील याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.