क्रिकेटवर सट्टा, दोन बुकींना पोलिसांनी केली अटक

42

सामना प्रतिनिधी । नांदेड

शहरातील वैभवनगर भागात एका घरामध्ये सुरु असलेल्या क्रिकेटच्या सट्टा बुकीवर बुधवारी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना अटक केली.

चैतन्यनगर भागातील वैभवनगर येथे एका घरामध्ये क्रिकेटवर सट्टा लावणारी बुकी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विनोद दिघोरे, फौजदार सदानंद वाघमारे, जसवंतसिंह शाहू, पोलीस कर्मचारी पांगरेकर, जावेद सातपुते, परदेशी, महिला कर्मचारी शारदा भोपळे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री जयश्री टाकळीकर नावाच्या बिल्डींगमधील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी सुधीर लक्ष्मणराव पाटील व पवन अशोक जाधव या दोघांना भारत-वेस्टइंडीज क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 6 मोबाईल, टीव्ही, 16 हजार रुपये रोख व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

सुधीर पाटील हा या भागात घर भाड्याने घेवून या ठिकाणी अनेक दिवसापासून क्रिकेटची सट्टा बुकी चालवत होता. त्याने घेतलेला सट्टा लातूर येथील नामवंत बुकी चालक मलंगसेठ यास देत असे. सुधीर पाटील याच्या बुक्कीवर पोलिसांनी धाड पडल्याने सट्टा खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सपोनि. विनोद दिघोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात सुधीर लक्ष्मणराव पाटील, पवन अशोक जाधव व मलंगसेठ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या