भाजपाचे लातूर जिल्ह्यातील केवळ २ मतदारसंघातील उमेदवार जाहीर

भाजपाच्या पहिल्याच यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर निलंगा विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. जिल्ह्यातील ४ मतदारसंघातील इच्छुकांची धडधड त्यामुळे वाढली आहे. औसा विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजपा युतीमध्ये भाजपास सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमदेवारीसाठी चुरस होती. केवळ निलंगा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हेच एकमेव इच्छूक होते. औसा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे त्यांनी विरोध असतानाही उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. भाजपाच्या यादीमध्ये केवळ या दोनच उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली आहेत.

लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघ, उदगीर विधानसभा मतदारसंघ, लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि बहूचर्चित अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजून ठरलेले नाहीत. लातूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची धडधड वाढलेली असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे यांनी भाजपाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या