
घर खर्चासाठी पैसे मागतात तसेच घरात राहू देत नाहीत या रागातून पोटच्या दोन दिवट्यांनी वृद्ध आईवडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसळा येथील मेंदडी गावात घडली आहे. वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह घरातील पलंगावर आढळून आले होते. अवघ्या चोवीस तासांत म्हसळा पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली. नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे हे वृद्ध दाम्पत्य मुलांसोबत मेंदडी गावात राहत होते. दोन दिवसांपूर्वी दोघांचे मृतदेह पलंगावर सापडले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हसळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या चोवीस तासांत आईवडिलांची हत्या करणाऱ्या दोन्ही मुलांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता खर्चासाठी पैसे मागतात तसेच घरात राहू देत नाहीत याचा राग मनात होता म्हणून आईवडिलांचा काटा काढल्याची कबुली दोन्ही मुलांनी दिली.
            
		





































    
    






















