
सामना प्रतिनिधी। हिंगोली
पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वसमत येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातील दोन कनिष्ठ लिपिकांना अनुक्रमे तीनशे आणि पाचशे रुपयांची लाच घेतांना हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या संबंधीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जलसंपदा विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी पूर्णा पाटबंधारेतील कनिष्ठ लिपीक मधुकर रामचंद्र वाढोणकर व माणिक नरसिंग पुरी यांच्याविरुध्द तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत सोमवारी एसीबीच्या पथकाने पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक झालेल्यांपैकी मधुकर यांनी भविष्य निर्वाह निधीचे देयक मंजुर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली होती. मधुकर याने यापूर्वी दोनशे रुपये स्विकारले तर आज तीनशे रुपयांचा लाचेचा उर्वरित हप्ता घेतांना त्याला पकडण्यात आले. तर दुसऱ्या प्रकरणात कनिष्ठ लिपीक माणिक यांनी कर्मचाऱ्याला रजेचा मोबदला मिळवून देण्यासाठी तसेच पत्नीच्या नावातील दुरुस्ती करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. यापैकी तीनशे रुपयांची लाच पुरी याने यापुर्वी स्वीकारली होती, असे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
तर संबंधीत तक्रारदाराकडुन सोमवारी पाचशे रुपये घेतांना पुरी याला पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील तक्रारदारांची नावे, कार्यवाही नेमकी किती वाजता झाली तसेच ईतर सविस्तर माहिती रात्री उशिरापर्यंत दिली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातुन सांगण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रामेश्वर थोरात व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

































































