
गोव्यात आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 28 वर पोहचला आहे. नव्याने 149 रुग्ण सापडले असून 92 जण बरे होऊन घरी गेले आहेत. विविध मार्गे गोव्यात येणाऱ्यांपैकी 129 जण कोविडग्रस्त आढळल्याने पर्यटन उद्योग सुरु केलेल्या गोव्यासमोर नवीन संकट उभे राहत आहे.
कोविडचे रुग्ण वाढतच असल्याने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी आरोग्य सेतू ऍपची सक्तीचे निर्देश दिल्या नंतर विरोधी पक्षाने त्यावर आवाज उठवला होता. आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण देताना ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना प्रवेश नाही, असा त्याचा अर्थ होत नसून ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत त्यांनी मात्र आरोग्य सेतू डाउनलोड केल्यास बरे होईल,असे आवाहन केले.
गोव्यात देखील एन 95 मास्कवर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय लक्षणे नसलेल्या रुग्णांकडे आवश्यक सोई सुविधा असतील तर त्यांना होम क्वारंटाइनची मुभा दिली जाईल,असेही मुख्यमंत्री सावंत यांनी आज सांगितले.
गोव्यात आतापर्यंत 4 हजार 176 रुग्ण सापडले असून त्यातील 2 हजार 541 बरे होऊन घरी गेले असले तरी 1 हजार 607 जण कोविडग्रस्त असून विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आज फातोर्डा येथील 50 वर्षीय इसमाचे कोविड हॉस्पिटल मध्ये निधन झाले.त्याशिवाय बोगदा-वास्को येथील 52 वर्षीय इसम जो गोमेकॉत उपचार घेत होता त्याचा काल मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 28 झला आहे.




























































