खेड तालुक्यातील दोन धरणं १०० टक्के भरली

346

गेले काही दिवस तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खेड तालुक्यातील दोन धरणे १०० टक्के भरली आहेत तर अन्य धारणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील बहुतांशी धरणांमध्ये आता मुबलक पाणीसाठा असल्याने या वर्षी उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

मध्यम लघु पाटबंधारे प्रकल्प नातूवाडीचे अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिरवली आणि शेलारवाडी ही दोन्ही धरणे मुदतीपूर्वीच १०० टक्के भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिरवली धरणातून १५ क्युमेक्स तर शेलारवाडी धरणातून १२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शिरवली आणि शेलारवाडी ही दोन्ही धरणे भरल्याने या धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न जवळ जवळ निकाली निघाला आहे.

मध्यम लघु पाटबंधारे या प्रकारात मोडणाऱ्या नातूवाडी धरणामध्ये सद्यस्थितीत ८९ टक्के पाणी साठा आहे. नियमाप्रमाणे ५ ऑगस्ट रोजी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले आहेत. येत्या चार दिवसात या धरणात १०० टक्के पाणी साठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धरणातील पाण्याची पातळी १०० टक्के झाली कि हीच पातळी कायम राखण्यासाठी गेट ऑपरेटिंग सिस्टिम सुरु करण्यात येत असल्याचे अभियंता श्रीमंगले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

खेड तालुक्यात दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नातूवाडी हे धरणं अतिशय महत्वाचे असून केवळ याच धरणातील पाण्यावर दुबार शेती पिकवली जाते. या वर्षी धरणात मुबलक पाणी असल्याने यावर्षी दुबार शेती करणाऱ्या शेकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शिरगाव येथील डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळवाडी धरणातही सध्या मुबलक पाणी साठा असून या धरणातूनही २९४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यातील कोंडिवली आणि तळवट या धरणामध्येही मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर सहज मत करणे शक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या