
धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 30 व 31 मे रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात शनिवारी बंद पाळला आहे. यावेळी बऱ्याच दिवसानंतर धाराशिव शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता.
सुरुवातीला ग्रीन झोन असणारा धाराशिव जिल्हा आता रेड झोनमध्ये गेला आहे. जिह्यात सध्या कोरोनाचे 64 रुग्ण असून यामध्ये दोन वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे येथून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांमुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच मुंबई व पुण्याहून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी धाराशिव जिह्यात 30 व 31 मे रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नागरीक, व्यापाऱ्यांनीही या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत शनिवारी आपली दुकाने, आस्थापना बंद ठेवल्या. मागील काही दिवसांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येत होती. मात्र, आज बऱ्याच दिवसांनी शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता.
नळदुर्ग येथेही जनता कर्फ्युस प्रतिसाद
नळदुर्ग शहर व परीसरात 30 मे रोजी जनता कर्फ्युला उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळाला. दवाखाने व औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व व्यवहार बंद होते. नळदुर्ग शहरातील गर्दीचे ठिकाणेही निर्मनुष्य दिसत होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अतीशय चांगला व योग्यच आहे. 30 मे रोजी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नळदुर्ग शहर व परीसरात जनता कर्फ्यूला व्यापारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळाला. नळदुर्ग शहरात यावेळी कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी ज्या ठिकाणी गर्दी असायची ते भागही आज निर्मनुष्य दिसत होते. त्याचबरोबर जळकोट, अणदुर, नंदगाव, लोहगाव, इटकळ आदी गावातही जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला.
































































