बंगालमधील १ कोटी मतदारांची नावे कापण्याचे टार्गेट, SIR यादी जाहीर झाल्यानंतर दोन जणांचा मृत्यू; अभिषेक बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. आगामी २०२६ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंगालमधील तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचे टार्गेट भाजपने आधीच ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाची एसआयआर (SIR) यादी जाहीर होताच उद्भवलेल्या तणावात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यावरून आता बंगालचे राजकारण पेटले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार तोफ डागत म्हटले की, निवडणूक आयोगाचा वापर करून विरोधी पक्षाच्या मतदारांची नावे पद्धतशीरपणे हटवण्याचे कारस्थान रचले जात आहे. एसआयआर (SIR) एक्सरसाइज सुरू होण्यापूर्वीच कोणाचे नाव काढायचे याचे आकडे ठरलेले होते, असा दावा त्यांनी केला. ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, तो या अन्यायी प्रक्रियेचा आणि मानसिक दडपणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले. हिंदुस्थानच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेचा राजकीय फायद्यासाठी असा वापर होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.

भाजपला २०२६ च्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते आता छुप्या मार्गाने मतदारांची छाटणी करत आहेत, असा आरोप करत बॅनर्जी यांनी याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. बंगालमधील जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचे कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत आणि या मृत्यूच्या यादीचा जाब केंद्राला द्यावाच लागेल, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.