
अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आणि मुसळधार पाऊस या तडाख्यात दोन मच्छीमार बोटी भरकटल्या असून त्यावरील ३२ खलाशी बेपत्ता आहेत. कोस्टगार्डच्या मदतीने या बोटींचा शोध घेण्याचे काम सुरू असले तरी अद्यापि त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे खलाशांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरण खराब झाले आहे. तसेच वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर शनिवारपासून मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र वादळाच्या इशाऱ्यापूर्वीच शेकडो मच्छीमार बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या आहेत.
अनेक मच्छीमार बोटींनी विविध बंदरातील किनारा गाठला असला तरी काही मच्छीमार बोटी अद्यापही वादळात अडकून पडलेल्या आहेत. न्हावा येथील सत्यवान पाटील यांच्या मालकीची श्री गावदेवी मरीन व सचिन पाटील यांच्या मालकीची चंद्राई या दोन बोटी गायब झाल्या असून त्याचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही. या बोटींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी सांगितले. दरम्यान वादळात अडकलेल्या करंजा-उरण येथील चार मच्छीमार बोटी आज दुपारी सुखरूप परतल्या. आता ३२ खलाशांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.




























































