नांदुर्खी परिसरात बिबट्याने दोन बोकडांचा पाडला फडशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून या परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी नांदुर्खीचे ग्रामस्थ राजेंद्र चौधरी यांनी केली. या परीसरात दोन ते तिन बिबटे असण्याची शक्यता आहे.

ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास नांदुर्खी शिवारात गोदावरी कालव्या लगत असलेल्या अरूण चौधरी यांच्या फार्म हाऊसवर घडली. तार कंपाऊंडच्या आत शेळ्या व बकरे बांधलेले असताना बिबट्याने दोरी तोडून दोन बोकड पळवून नेले. जवळ असलेल्या उसाच्या शेतात त्यांचा फडशा पाडला.

या घटनेची माहीती अरूण चौधरी यांनी वनविभागाला कळविली असता वनविभागाचे सुराशे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पशु वैद्यकीय अधीकारी डॉ. सौ. पवार यांनी पंचनामा केला. कालव्यालगत असलेल्या या परिसरात ऊस व पेरूबागांचे मोठे क्षेत्र असल्याने या परीसरात बिबट्यांना लपण्यासाठी मोठी जागा असून तिन ते चार संख्येने बिबटे फिरत आहेत. या बिबट्याच्या भितीने शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.

कंदूरी पुर्वीच बिबट्याने पाडला फडशा
चौधरी कुटुंबियांनी देवाच्या कंदूरीसाठी हे दोन खास बोकडे तयार केले होते. दोन दिवसांनी कंदूरीचा बेतही ठरविला होता. त्यासाठीचे सर्व साहीत्यही त्यांनी जमा केले. मात्र कंदुरीचा दिवस उजाडण्यापुर्वीच या बिबट्यांनी दोन्ही बोकड्यांचा फडशा पाडल्याने चौधरी कुटूंबियांनी कंदूरीचा बेतच रद्द केल्याचे सांगीतले.