
सातारा शहरात दुचाकीचोरीचे गुन्हे करणाऱया व मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुंडांना पाठलाग करून पकडण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. संशयितांकडून दुचाकीचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, दुचाकी निव्वळ हौसेने फिरवण्यासाठी चोरी करत असल्याचे व वापर करून सोडून देत असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.
विकास मुरलीधर मुळे (वय 22, पॉवर हाउस झोपडपट्टी, सातारा) आणि ऋत्विक धनंजय पंडित (वय 21, कळकाच्या बेटाजवळ, गडकर आळी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना सातारा बसस्थानक परिसरात पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर तडीपारीच्या कारवाईचा भंग केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरात दुचाकीचोरीचे गुन्हे वाढले आहेत. याबाबत आरोपींची माहिती संकलित करून हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव व त्यांच्या सहकाऱयांना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलीस रेकॉर्डवरील तडीपार गुंड त्याच्या घराच्या परिसरात फिरत असून, त्याने दुचाकीचोरी केल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यावेळी या पद्धतीने त्याच्या घराकडे जाऊन तपासणी सुरू केली असता, पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला होता. मात्र, पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी 15 दिवसांपूर्वी सातारा शहरातून पाच दुचाकींची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.





























































