
लग्नसोहळा हा तसा आनंदाचा दिवस असतो. पण, उत्तर प्रदेशमध्ये मात्र एका लग्नात एक अजबच प्रकार घडला आहे. एकाच लग्नात पोहोचलेल्या दोन वरांपैकी एकाला वधूने माळ घातली तर दुसऱ्यासोबत घरी गेली आहे.
अचंबित करणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात घडली आहे. येथील सिराव नावाच्या गावात दोन तरुण एकाच तरुणीशी लग्न करण्यासाठी वरात घेऊन आले. आधी ज्या नवऱ्याची वरात वधुच्या दारी पोहोचली होती, त्या वराला तिने वरमाळ घातली.
पण, काही वेळाने तिच्या दारात अजून एक वरात पोहोचली. दुसऱ्या वरातीला पाहून नवऱ्या मुलीने पहिल्या नवऱ्याचं वय जास्त असल्याचं कारण सांगून लग्न मोडलं आणि दुसऱ्या तरुणासह सात फेरे घेऊन लग्न केलं आणि तिची पाठवणी करण्यात आली.
या प्रकाराने धक्का बसलेल्या पहिल्या तरुणाच्या घरच्यांनी तिथेच गोंधळ करायला सुरुवात केली. गोंधळाला राड्याचं स्वरूप मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. नवऱ्या मुलाकडच्यांनी मुलीच्या वडिलांवर फसवणुकीचा आरोप केला. तशी रीतसर तक्रारही त्यांनी दाखल केली. नवऱ्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.





























































