
शाहीन बागेतील रस्ता खुला करण्यावरून आज आंदोलकांमध्येच फूट पडली. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थांनी केलेल्या आवाहनावरून आंदोलकांनी एका बाजूने रस्ता खुला केला. मात्र दुसऱया गटाने लगेचच रस्ता बंद केला. यामुळे वाहतुकीची कोंडी कायम राहिली. त्यानंतर या रस्त्यावरचे बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद झाला आहे. या आंदोलनामुळे परिसरातील बाजारपेठेलाही टाळे लागले आहे. शाहीन बागेतील आंदोलन चालू राहावे पण नागरिकांची कोंडी होत असल्यामुळे रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाचा हक्क मान्य केला, पण त्यासाठी रस्ता अडवणे योग्य नसल्याचे स्पष्ट करून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी संजय हेगडे व साधना रामचंद्रन यांची नेमणूक केली.


























































