नायजेरियन भामट्यांचा फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीला 89 लाखांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऍक्वाफेरा हर्बल ऑइलची आवश्यकता आहे, अशी बतावणी करून शिताफीने आपल्याच कंपनीकडून हर्बल ऑइल खरेदी करण्यास सांगून एका फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीला परदेशी कंपनीच्या नावाने नायजेरियन भामट्यांनी 89 लाखांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका नायजेरियनसह त्याला साथ देणाऱया हिंदुस्थानी तरुणाला अटक केली आहे.

जीटीबी फार्मास्युटिकल यू.के. या बनावट कंपनीने एमआयडीसी परिसरात असलेल्या फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीला ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. आमची कंपनी औषध बनविणारी कंपनी असून त्यासाठी ऍक्वाफेरा हर्बल ऑइलची गरज आहे. हिंदुस्थानातील लोकल व्हेंडर तिवारी फ्लुइडस कंपनीकडून ते ऑइल खरेदी करून आम्हाला द्या असे जीटीबी कंपनीने फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीला सांगितले. जीटीबी कंपनी परदेशी असून ती फसवणूक करणार नाही असा समज करून फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीने तिवारी फ्लुइडस कडून 100 लिटर ऑइल खरेदी केले. आपल्या कंपनीवर विश्वास बसावा यासाठी जीटीबी कंपनीने एका परदेशी नागरिकाला पाठवून फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱयांशी गाठीभेटी घेण्यास सांगितले होते. जीटीबी कंपनी बोगस असून तिवारी नावाची कंपनीदेखील बोगस आहे. या दोन्ही कंपनीच्या नावाने नायजेरियन भामटय़ांनी फार्मास्युटिकल कन्सल्टंटला 89 लाखांचा चुना लावला. हा प्रकार लक्षात येताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

आरबीआयच्या नावाने चुना
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केदारी पवार, श्रीनिवास कामुनी, देविदास मुपडे, स्वप्नील भुजबळ व पथकाने तपास सुरू करून फार्मास्युटिकल कन्सल्टंट कंपनीला चुना लावणाऱया आयकेब ओकोरोक या नायजेरियन इसमाबरोबर जयगणेश पठ्ठे (26) याला पकडले. फिर्यादी कंपनीने हर्बल ऑइल दिल्यानंतर पैशांची मागणी केली असता तुमच्या पैशांचा डीडी आरबीआयमध्ये डिपॉझिट केल्याचे आरोपींनी सांगितले. मग त्या कंपनीला फोनवरून संपर्प साधून आरबीआयमधून बोलत असल्याचे भासवले व तुमचा डीडी पास करण्यासाठी विविध फी लागेल असे सांगून आणखी 25 लाख उकळले होते.