
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. या वेळी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
नवीन वर्षी जानेवारीपासून हिंदुस्थानी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम अधिक तीक्र केली आहे. तरीही दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. काल सोमवारी उरी परिसरातील मोहरा कॅम्प येथे दोन संशयित आढळले. जवानांनी गोळीबार करीत शोधमोहीम सुरू केली. त्यातच पुलवामा येथील रत्नापोरामध्ये दहशतवादी लपल्याची खबर मिळाली. जवानांनी परिसराला वेढा टाकला. येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजीतसिंग आणि निमलष्करी दलाचे जवान सनीद हे शहीद झाले. एक जवान जखमी झाला आहे.
– या चकमकीवेळी गावकऱयांनी जवानांवर दगडफेक करून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. जवानांकडून या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
हिजबूलच्या दहशतवाद्याचा खात्मा
या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिलाल अहमद याचा खात्मा करण्यात आला. गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नावीद जट हा हॉस्पिटलमधून पसार झाला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही नावीद पळाला. यासाठी हिलाल अहमदने त्याला मदत केली होती. मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत तो होता.



























































