पुराच्या पाण्यात दोन दुचाकीस्वार गेले वाहून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील लोहा तालुक्यातील दोन इसम मोटारसायकलने जात असताना नाल्यावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून गेल्याची घटना घडली आहे. बंडू एकनाथ बोढारे (४९) व जयराम काशीनाथ भुजबळ (४६) अशी या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे लोह्यातील खाजगी कामे आटोपून मोटारसायकल क्र.एमएच-२६-बीके-३६३३ ने सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जात असतांना धानोरा गावानजीक अर्धा किमी अंतरावर नाल्यावरील पुलावरून जोरदार पाणी वाहत होते. मोटारसायकलस्वार बंडू एकनाथ बोढारे व जयराम भुजबळ धानोरा हे पुराच्या पाण्यातून जाण्याच्या तयारीत असतांना शेजारी उभ्या असलेल्या नागरिकांनी ‘पाण्याचा प्रवाह जोरदार आहे, पुढे जाऊ नका’, असे ओरडून सांगितले. मात्र हे दोघे कोणाचेही न ऐकता पुढे गेले. त्यांना नाल्यातील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही मोटारसायकलसह पाण्यात वाहून गेले. या घटनेला तब्बल चौदा तास उलटले असून अद्याप वाहून गेलेल्यांचा शोध लागला नाही आहे.