
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
जिल्ह्यातील राजुरास्थित इन्फन्ट जिजस हायस्कूलच्या वसतिगृहातील मुलींवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप माजीमंत्री शोभाताई फडणवीस यांनी केलाय. अत्याचार झाल्याचा संशय असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सध्या चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इन्फन्ट जिजस हायस्कूल हे कॉन्व्हेंट राजुराचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचं आहे. सध्या तेच याचे अध्यक्ष आहेत.
चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या दोन अल्पवयीन मुलींवर उपचार सुरू आहेत. या मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. इन्फन्ट जिजस हायस्कूल संचालित राजुरा येथील वसतिगृहातील या मुली आहेत. सुमारे 130 आदिवासी मुली या वसतिगृहात आहेत. मात्र, यातील सात-आठ मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या मुलींची वारंवार तब्येत बिघडत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले जात होते. मात्र, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मुलींची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना इथं हलवण्यात आलं. त्यामुळंच या प्रकरणाला वाचा फुटली. मर्दानी महिला आस्था मंचच्या महिला पदाधिका-यांना याची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर या मुलींची भेट घेऊन विचारपूस केली. यात त्यांना गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजीमंत्री तथा भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि शोभाताई फडणवीस यांनी सांगितल्यानुसार, या मुलींना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केला जात होता. त्यामुळं बेशुद्धावस्थेत घडलेल्या अत्याचाराबद्दल या मुलींना काहीच माहित नाही. अत्याचार कुणी केला, हेही त्यांना माहित नाही. त्यामुळं पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. मर्दानी महिला आस्था मंचने तक्रार देताच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे शाळा संचालकांनी याप्रकरणी पोलिसांना सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचं इन्फन्ट जिजस हायस्कूल चे सचिव अरुण धोटे यांनी सांगितलं

























































