जोगेश्वरीत आणखी दोन लसीकरण केंद्रे सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लसीकरणाला वेग देण्यासाठी आता जोगेश्वरी पूर्व येथे आणखी दोन कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत  मातोश्री आर्टस् आणि स्पोर्टस् ट्रस्ट व बाल विकास मंदिर येथे ही केंद्रे सुरू करण्यास पालिका प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे जोगेश्वरीतील नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. मात्र लसीकरण केंद्रांवर जनतेची वाढती गर्दी लक्षात घेता केंद्राची संख्या वाढून या लसीकरणाचा लाभ वेळीच जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा या हेतूने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ‘मातोश्री आर्टस् आणि स्पोर्टस् ट्रस्ट’ व ‘बाल विकास विद्या मंदिर’ या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे पत्र आमदार रवींद्र वायकर यांनी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना दिले होते. या पत्रानुसार के पूर्वचे वैद्यकीय अधिकारी, परिरक्षण विभागाचे अधिकारी, नगरसेवक बाळा नर यांनी या दोन्ही जागेची पाहणी केली. हे केंद्र सुरू करण्याकरिता आवश्यक लसीकरण कक्ष, प्रतीक्षा कक्ष, निरीक्षक कक्ष, नोंदणीकरिता आवश्यक जागा या ठिकाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याचे पत्र आमदार वायकर यांना पाठविले आहे.

त्यामुळे या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून लवकरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मातोश्री आर्टस् आणि स्पोर्टस् ट्रस्ट’ येथे पालिकेकडून तात्पुरते कोविड सेंटर सुरू करण्याची सूचनाही वायकर यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांना केली आहे. नगरसेवक बाळा नर यांनीही लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, के पूर्व यांना पत्र दिले होते.