
रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवण्यात आले होते. रत्नागिरी नगर परिषदेत शिंदे गटाच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे येणार आहेत. मात्र, स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदे गटाकडे ३८ जणांची वेटिंग लिस्ट आहे.आता त्या ३८ जणांपैकी कोणाला स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी कोणाला लागणार आणि निवडणूकीत पराभूत झालेल्या कोणत्या उमेदवाराचे पुनर्वसन होणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे अनेकांना सहा महिने-एक वर्षाचे स्वीकृत नगरसेवक पद देतो असे सांगून समजूत काढण्यात आली होती. काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली, त्यांनाही अर्ज मागे घेताना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवण्यात आले. नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे तीन स्वीकृत नगरसेवक पदांपैकी दोन पदे शिंदेगटाला मिळणार आहेत. शिंदे गटाकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी 38 इच्छुक उमेदवार आहेत.आता यापैकी कुणाला लॉटरी लागणार? याची चर्चा सुरू असतानाच अन्य काही मंडळीची नावे स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत आल्यामुळे इच्छुकांना टेन्शन आले आहे. भाजपच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येणार असून निवडणुकीच्या काळात प्राजक्ता रूमडे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले होते. आता मात्र अन्य उमेदवाराचे नाव चर्चेत आले आहे.


























































