धोकादायक इमारतींच्या मालकांना दोनदा नोटीस पाठवणार

इमारत दुर्घटनेत होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतींच्या मालकांना महिन्यातून दोन वेळा नोटीस पाठवण्यात येणार असून रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्यास अशा इमारतींचे वीज, पाणी कनेक्शन तोडा, असे सक्त आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.

फोर्ट येथील भानुशाली इमारत, नागपाडा येथील मिश्रा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीर दखल घेत मुंबई शहर व उपनगराच्या प्रत्येक विभागातील धोकादायक इमारतीची सद्यस्थिती जाणून याबाबत एक निश्चित धोरण बनवण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला 24 विभागांमधील कार्यकारी अभियंते (पदनिर्देशित अधिकारी) उपस्थित होते. पालिका क्षेत्रात 443 धोकादायक इमारतींसह मुंबईत आणखी 16 हजार धोकादायक इमारती आहेत.

जुन्या इमारतींची वेगळी यादी

मुंबई महापालिका धोकादायक इमारतींबाबत आता कठोर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. याबाबत पालिका गंभीर असल्याचा संदेश संबंधित मालकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचा आपल्याकडे रेकॉर्डसुद्धा ठेवा. त्याचप्रमाणे ज्या इमारतींना 80 ते 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, अशा इमारतींची यादी तयार करा. त्यासोबतच ज्या इमारती 1982 ते 1987 या काळामध्ये बांधलेल्या आहेत त्यांची वेगळी एक यादी तयार करावी, असे निर्देशही महापौरांनी दिले.

…तर मालक-विकासकावर कारवाई

पुनर्विकासाबाबत ज्या ठिकाणी भाडेकरू आणि मालक एकत्र आले आहेत त्यांच्याबाबत महापालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा तसेच ज्या ठिकाणी पुनर्विकासाबाबत मालक किंवा विकासक ऐकत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. अनधिकृत बांधकाम, एमआरटीपी ऍक्टप्रमाणे विभागात काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल तयार करा. गावठाणमधील जुन्या इमारतींवर कारवाई करण्यापूर्वी कागदपत्राची शहानिशा करावी, असे निर्देशही महापौरांनी दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त अतिक्रमण निर्मूलन आचरेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या