केस रंगवायला ट्रीपल सीट निघाले, बाईक धडकून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतूक नियमांचं पालन करा, असं आवाहन वारंवार करण्यात येतं. तरीही त्या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचं चित्र आहे. अशाच एका घटनेत ट्रिपलसीट बसून जाणाऱ्या बाईकस्वारापैकी दोन तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेतील मृत तरुणांची नावं हिमेश पड्या आणि लक्ष्य अशी आहेत. ते दोघेही कुर्ला येथील बैल बाजार परिसरात राहत होते. तर तिसरा तरुण अनिश गुप्ता हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाला त्या दिवशी हे तिघेही आपले केस रंगवण्यासाठी कुर्ल्यातील हालव फूल येथे गेले होते. तिथून त्यांनी हेअर जेल आणण्यासाठी चेंबुरला जाण्याचं निश्चित केलं.

एकाच बाईकवर बसून ते तिघे चेंबुरच्या दिशेने निघाले. सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोडवर जात असताना वेगात असलेल्या बाईकवरचं नियंत्रण सुटल्याने त्यांची बाईक दुभाजकाला धडकली. या दुर्घटनेत बाईकचा चालक हिमेश आणि सगळ्यात मागे बसलेला लक्ष्य यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांच्या मध्ये बसेलल्या अनिश गुप्ता याला किरकोळ जखमा झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांपैकी कुणाकडेही बाईक चालवण्याचा परवाना नव्हता. त्यांच्यापैकी कुणीही हेल्मेटही घातलं नव्हतं. या प्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्युला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.