
जमिनीच्या प्लॉटचा खरेदी व्यवहार नियमित करून देण्यासाठी आवश्यक असणारा मूल्यांकन दाखला देण्यासाठी एंजटमार्फत 1500 रुपयांची लाच घेताना शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. दिलीप आनंदा लाड (वय 31, रा. कागलवाडी, कोल्हापूर) व लाच स्वीकारणारा एंजट राजेंद्र सातलिंगा कुंभार (वय 51, रा. शिरोळ) यांना अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या बहिणीने जयसिंगपूर येथे बिगरशेती 140.63 चौरसमीटरचा प्लॉट खरेदी केला होता. मात्र, हा प्लॉट नियंत्रित सत्ताप्रकारातील असल्याने त्यांचे नाव प्लॉटच्या मालकीहक्कात लागले नव्हते. अजूनही मूळ मालकाचे नाव मालकीहक्कात असल्याने त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे 31 जुलै 2019 रोजी अर्ज केला होता. जिल्हाधिकार्यांनी हा अर्ज शिरोळच्या तहसीलदारांकडे चौकशीसाठी पाठविला. तहसीलदारांनी जयसिंगपूर मंडल अधिकार्यांकडे हा अर्ज पाठविला. फिर्यादीसह त्यांची बहीण या अर्जाबाबत काय झाले, याची चौकशी करण्यासाठी मंडल कार्यालयात आले असता व्यवहार नियमित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसोबत २८ जानेवारी रोजी मंडल कार्यालयात हजर राहण्याची नोटीस दिली. या नोटीसमध्ये व्यवहार झालेल्या प्लॉटचा या वर्षीचा मूल्यांकन दाखल्याबाबतचा उल्लेख होता.
फिर्यादी व त्यांची बहीण शनिवारी शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा दाखला मिळावा, असा अर्ज घेऊन गेले होते. यावेळी कनिष्ठ लिपीक दिलीप लाड याने हा अर्ज वाचून सुरुवातीला प्लॉटची विक्री बेकायदेशीर असून असा दाखला देता येत नसल्याचे सांगितले. तेव्हा हा दाखला मंडल अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा असल्याने द्यावा, अशी विनंती केली असता लाड याने हा मूल्यांकन दाखला मिळविण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. काहीतरी कमी करा, अशी विनंती करूनही त्याने फिर्यादीचे काही न ऐकता त्यांचा अर्ज परत केला. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी लाड याने लाचेची रक्कम वाढवून मागितल्याचेही निष्पन्न झाल्याने अधिकार्यांनी शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावला. यावेळी दिलीप लाड याने फिर्यादीस हवा असलेला दाखला देऊन लाचेची रक्कम तेथील एंजट राजेंद्र कुंभार याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार 1500 रुपये घेताना अधिकार्यांनी कुंभार याला रंगेहाथ पकडले. या दोघांविरुद्ध शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, हवालदार मनोज खोत, रुपेश माने, मयूर देसाई यांनी केली.




























































