सावकारी करून जादा दराने व्याज आकारणाऱ्या दोघांना अटक

पुण्यात सावकारी करून जादा दराने व्याज आकारणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तीन लाखांच्या रकमेवर जादा दराने व्याज आकारुन जबदस्तीने मोटार आणि 5 लाख 25 हजारांचा धनादेश दोघांनी जबरदस्तीने घेतला. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय 25, रा. नाना पेठ) आणि अमित धनंजय बोराटे (वय 26, रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रवीण कृष्णा भिकुले (वय 34, रा. गुरुवार पेठ) यांनी याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि आरोपी अक्षय व धनंजय एकमेकांच्या ओळखीचे आहेत. प्रवीणला पैशांची गरज असल्यामुळे त्याने ऑगस्ट 2019 मध्ये अक्षयकडून तीन टक्के दराने तीन लाख रुपये घेतले होते. त्यानंतर चार महिन्यांत प्रवीणने अक्षयला 94 हजार रुपये परत दिले. जानेवारी ते सप्टेंबर 2020 पर्यंत अक्षयने तीन लाखांवर जादा दराने व्याजदर आकारत प्रवीणला 5 लाख 25 हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगितले. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत अक्षयने प्रवीणच्या वडिलांची मोटार जबदरस्तीने नेली. त्यानंतर प्रवीणच्या वडिलांकडून 5 लाख 25 हजारांचा धनादेश जबरदस्तीने घेतला. जादा व्याज आकारून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या