बनावट ई पास बनवणार्‍या दोघांवर गुन्हा; कोरोनाचे निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ मुंबई सीटी महाराष्ट्र या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करत बनावट ई पास बनवून प्रवाशांची फसवणूक करणारे दोनजण खेड पोलीसांच्या जाळ्यात सापडले आहेत.

वाहनचालक दिनेश कार्लेकर (रा.ज़ोगेश्वरी) यांच्या शेजारी राहणारा मनोज दुधवडकर हा बनावट ई पास बनवून दिला आहे. त्यांनी चालक दिनेश कार्लेकर यांच्या नावाचा पास खरा आहे असे भासवत बनावट पास तयार करण्यास मदत केली आणि विक्रांत सोनावणे याने बनावट पास तयार करुन दिला. त्यामुळे या दोन्ही आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरीता संघटीतरित्या काम करुन ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ मुंबई सीटी महाराष्ट्र या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करुन प्रवाशांची फसवणूक केली. तसेच हा पास हॉस्पिटलमधील उपचारासाठी हवा असल्याचे खोटे कारण दिले. त्यामुळे खेड पोलीस ठाण्यात या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असताना झोलाई प्रसन्न मिनी ट्रॅव्हल्समधून विना ई पास वाहतूक करणाऱ्यांवर खेड पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी निलेश साबळे (रा.सवेणी, खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिपळूण येथील लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करता कढई अ‍ॅण्ड स्नॅक सेंटर सुरु ठेवल्यामुळे ज्ञानेश्वर कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर साईकृपा किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स वेळेनंतरही सुरु ठेवल्यामुळे चंद्रशेखर खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यात कोविडच्या काळात मृतदेह हाताळण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करुन सामुहिकरित्या मृतदेहाचा दफनविधी करणाऱ्या फकीर हवालदार, सारंग, बलबले आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.