
सामना प्रतिनिधी, ठाणे
दोन चिमुकलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या दोन नराधमांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अत्याचार आणि हत्येच्या चार खटल्यांतील आरोपींना अवघ्या अडीच महिन्यांत न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने आज महिला दिनी त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त झाली.
कासारवडवली येथील रामकिरीत गौंड (33) याने काकेसर भागात खेळणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर मुलीची हत्या करून तिला शेतातील पाण्याच्या डबक्यात फेकून दिले होते. त्याला तत्कालीन पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी अटक केली होते. तर दुसऱ्या प्रकरणात भिवंडीच्या भोईवाडा भागात राहणाऱ्या चार वर्षीय मुलीचीही अत्याचारानंतर आरोपी मोहम्मद शेख (20) याने 2018 मध्ये हत्या केली होती. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर कापूरबावडी येथील सुमंतकुमार झा (38) याने पाच वर्षीय मुलीवर केलेल्या अत्याचारप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायमूर्ती एस. ए. सिन्हा यांनी सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांच्या युक्तिवादानंतर ही शिक्षा सुनावली.
मुंब्य्रातील पीडित मुलाला न्याय
मुंब्रा येथे वर्षभरापूर्वी आरोपी मोहम्मद पठाण याने आठ वर्षीय मुलावर डोंगरावरून पतंग काढून देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेत अत्याचार केले होते. त्यानंतर या मुलाची दगडाने ठेचून नराधम पठाण याने हत्या केली. त्यालाही सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती सिन्हा यांनी जन्मठेप सुनावली.



























































