आईने आत्महत्या केली, वडिलांचे निधन झाले; ऐरोलीत दोन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ऐरोली येथील सेक्टर 10 मध्ये घडली. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईनेही आत्महत्या करून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लक्ष्मी पंथारी (33) आणि स्नेहा पंथारी (26) या दोघी बहिणी गेल्या काही वर्षांपासून सेक्टर 10 मधील सागर दर्शन सोसायटीत असलेल्या इमारत क्रमांक बी -15 मध्ये राहत होत्या. लहान मुलांचे क्लासेस चालवून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या घरामधून आज अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी हा प्रकार माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या कानावर घातला. त्यानुसार चौगुले यांच्यासह रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार हेही घटनास्थळी आले. पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दोन्ही बहिणींनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी या दोघींनी सुसाईड नोट लिहिलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत