काबूलमध्ये अमेरिकेच्या विमानातून पडलेल्या व्यक्तींची ओळख पटली, वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबान्यांपासून बचाव व्हावा यासाठी अमेरिकेच्या लष्करी विमानात लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 जणांचा मृत्यू झाला आहे. C-17 बनावटीचे हे विमान अमेरिकेने काबूलला पाठवलं होतं. अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांच्या सुटकेसाठई आवश्यक ती सामुग्री घेऊन हे विमान काबूलला पोहोचलं होतं. हवाईपट्टीवर उतरल्याच्या अवघ्या काही मिनिटांत हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं होतं. या विमानात शिरण्याचा घाबरलेल्या अफगाणी नागरिकांनी प्रयत्न केला होता. विमानात शिरता येत नसल्याने काहींनी विमानाच्या पंखावर, चाकावर जिथे जागा मिळेल तिथे बसण्याचा प्रयत्न केला होता. हे विमान हवेत झेपावल्यानंतर 2 जण उंच आकाशातून पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दोघांची ओळख पटली असून ते दोघे सख्खे भाऊ होते.

अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांत म्हटलंय की हे दोघे भाऊ अवघ्या 16 आणि 17 वर्षांचे होते आणि कलिंगडं विकण्याचं काम करत होते. हे दोघे त्यांच्या आईसोबत राहात होते. या मातेची दोन्ही मुलं तिने गमावली आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने ही दोघी मुलं त्याच्या आत्याच्या शेजारी राहात असल्याचं ट्विट केल्यानं त्यांची ओळख कळू शकली आहे. या ट्विटर वापरणाऱ्याने सोमवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की या दोघांचे मृतदेह नुकतेच त्यांच्या घरी आणण्यात आले आहेत. ‘या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांची आई कशी काय जगणार हे माहिती नाही’ असंही ट्विट करणाऱ्याने म्हटलं आहे.

काबूलवरून परतलेल्या विमानाच्या लँडींग गिअरमध्ये मानवी देहाचे तुकडे सापडले

अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी हवाई दलाचे विमान पाठवले होते. यातल्या एका विमानाच्या चाकाच्या खोबणीमध्ये मानवी देहाचे तुकडे सापडले आहेत. या प्रकाराची चौकशी केली जात असल्याचं मंगळवारी अमेरिकेच्या हवाई दलाने सांगितलं.

आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठीच्या मोहिमेसाठी सामुग्री घेऊन C-17 हे अतिविशाल विमान काबूलला पाठवण्यात आले होते. अमेरिकेला परतण्यापूर्वी हे विमान कतारमधील अल-उदैद विमानतळावर थांबले होते. तिथे विमानाची पाहणी केली जात असताना विमानाच्या लँडींग गिअर जवळ मानवी देहाचे तुकडे सापडले होते. हे विमान हवेत झेपावत असतानाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तानमधील काहीजण या विमानात शिरता येत नसल्याने चाकावर, पंखावर आणि जिथे जागा मिळेल तिथे बसले असल्याचं दिसत होतं. विमान झेपावल्यानंतर यातले काही जण खाली पडत असतानाता व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.