रेती उत्खननाचे दोन बळी, किनवटमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट

व्हॉलीबॉलच्या सरावानंतर कोठारी नाल्यावर डब्बापार्टी  करण्यासाठी गेलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून  मृत्यु झाला. तर नाल्या लगतच्या शेतकर्‍यांच्या सतर्कतेमुळे एकाचा प्राण वाचला. सेंट मेरी  इंग्लिश स्कूल गोकुंदा येथील हे विद्यार्थी असून  रविवारी  दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रेती तस्करांनी अमर्याद केलेल्या उत्खननाचे हे विद्यार्थी बळी ठरले आहेत.

सेंट मेरी इंग्लिश स्कूल या शाळेतील जवळपास अकरा विद्यार्थी शाळेच्या परिसरात व्हॉलीबॉलचा दर रविवारी सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत नियमित सराव करतात. रविवारी  ३० सप्टेबर रोजी  दुपारच्या काळात ते कोठारी नाल्यावर डब्बा पार्टीसाठी गेले होते. दरम्यान सम्यक अशोक भवरे आदी नारायण  बिल्लेलवार या दोन विद्यार्थ्यांसह अन्य एकजण पोहण्यासाठी कोठारी नाल्यावर गेले. रेल्वे पुलाजवळ पोहत असतांना  रेती उत्खनन केलेल्या पंधरा ते वीस फूट खोलीच्या खड्यात गेल्यानंतर ते परत बाहेर आले नाहीत. तिसरा विद्यार्थी खड्यात बुडत असतांना इतर विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केल्यानंतर सभोवतालचे शेतकरी धावले अन् एका विद्यार्थ्यांचा प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले. यात सम्यक अशोक भवरे , आदी नारायण  बिल्लेलवार हे दोन्ही विद्यार्थी बुडून मरण  पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याच नाल्यात रेती तस्करांनी प्रचंड अमर्याद खड्डेच खड्डे केले आहेत. महसूल विभागाच्या बहाद्दर अधिकार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका अन् कारवाईचे नाटक केल्याचा हा परिणाम असल्याच्या उपस्थितांमध्ये प्रतिक्रीया उमटत होत्या. मृत विद्यार्थ्यांची किनवट पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.