औंढा नागनाथ तालुक्यात शेततळ्यामध्ये बुडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी येथुन आलेेेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर या गावाच्या शिवारात आज 14 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी व जमावबंदी आहे. मात्र, परभणी येथील महाविद्यालयात शिकत असलेल्या युवकांनी औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर येथील सतीश उदास या मित्राच्या शेतात जाण्याचे ठरवले. परभणीहून मुख्य मार्ग सोडुन आडमार्गाने हे सर्व मित्र जलालपूर येथे आले. आज 14 एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास हे सर्व मित्र शेतात पोहोंचले. त्यानंतर शेतात जेवण केल्यावर सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास सतीश हा काका बाळू उदास यांच्या शेतातील एका शेततळ्यावर सर्वांना घेवून गेला.

पोहायला येत नसतानाही सतीश लक्ष्मणराव उदास (वय 20, जलालपूर) व ॠषिकेश पांडुरंग भराड (वय 20, नांदखेडा, ता.परभणी) हे शेततळ्यात उतरले.  मात्र शेततळ्यात 15 ते 16 फुट खोल पाणी असल्याने हे दोन जण बुडाले. अन्य सहा ते सात जण शेततळ्याच्या बांधावर उभे होते. हे दोघे बुडायला लागल्याने एकाने पोहता येत असल्याने उडी मारून त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. सव्वापाचच्या सुमारास जेसीबीने शेततळे फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याला याबाबतची माहिती देण्यात आली असुन अद्याप या घटनेची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.